या प्रश्नाचं उत्तर प्रशासन देणार का?
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटिल व पोलीस कर्मचारी यांची पत्रकाराला धमकी व वर्दीचा गैरफायदा सर्वसामान्य नागरिकांवर , सर्वसामान्य नाकरीकांच्या तक्रारी दाखल करून घेतल्या जात नाही


गेवराई | प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतुकीचे सत्र अक्षरशः जोमात सुरू असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ही अवैध वाहतूक संदीप पाटील हे सहाय्यक पोलीस निरीक्षक झाल्यापासून अधिकच वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, या वाळू माफियांच्या पाठिशी पोलीस प्रशासन आहे का, असा थेट सवाल उपस्थित होतोय.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसाढवळ्या ट्रॅक्टर आणि हायवा वाहने अवैध वाळू घेऊन रस्त्यावरून बेधडक फिरताना दिसत असून, कुठेही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. ही सगळी हलचल पोलीस ठाण्याच्या काही अंतरावरच सुरू आहे, त्यामुळे पोलीसांना ही माहिती नाही, हे मान्य करणे कठीण आहे. संदीप पाटील यांच्या आशीर्वादानेच ही वाळू तस्करी सुरू आहे का? असा थेट आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही, उलट माहिती देणाऱ्यांनाच धमक्या मिळत असल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. ट्रॅक्टर, डंपर आणि हायवा वाळूने भरून बेधडक फिरताना आढळत आहेत. विशेष म्हणजे ही वाहतूक चकलांबा पोलीस ठाण्याच्या नाक्यावरून होत असूनही कुठलीही कारवाई होत नसल्याने संशयाचे वातावरण तयार झाले आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या “मूकसंमतीने”च ही वाहतूक सुरू असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.
वाळू तस्कर आणि अवैध धंदेवाल्यांकडून नियमित हप्ता घेतल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस कर्मचारी अमोल येळे व कुलकर्णी यांनी झोपेचे सोंग घेतल्याचा गंभीर आरोप होत आहे. गावात दिवसाढवळ्या अवैध वाळू वाहतूक सर्रास सुरू असूनही पोलीस प्रशासन गप्प बसले आहे. हप्त्याच्या बदल्यात कायद्याचा सौदा केला जात असल्याचे आरोप ग्रामस्थांमधून होत असून, अशा अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे. या प्रकाराकडे उपविभागीय अधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करणे आवश्यक असून, अन्यथा प्रशासनाच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.
चौकट-
पत्रकाराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी व गावातील अवैध धंद्यावाल्यांना अंगावर घातले; चौकशीची मागणी!
सत्य प्रकाशित केल्याच्या रागातून एका पत्रकाराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित पत्रकाराने काही अवैध धंद्यांविरोधात बातमी प्रसिद्ध केल्यानंतर ही धमकी आल्याचे सांगण्यात येत आहे. पत्रकारितेवर दबाव आणण्यासाठी असे प्रकार घडत असतील, तर तो लोकशाहीसाठी धोकादायक इशारा आहे. संबंधित अधिकाऱ्यांची व धमकी देणाऱ्यांची तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून होत आहे.




