आज जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे किल्ले प्रतापगड प्राधिकरण समितीची नियोजन बैठक पार पडली.या बैठकीत किल्ले प्रतापगड परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या योजनांवर चर्चा झाली.
शिवछत्रपतींचा अजरामर वारसा आणि किल्ले प्रतापगडाचा जाज्वल्य इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि किल्ल्याचे संवर्धन, सौंदर्यवर्धन व ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात, यावर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.यावेळी प्राधिकरण समितीचे अध्यक्ष या नात्याने सर्व सदस्यांच्या सूचनांना व मतांना अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतले. किल्ल्याच्या विकासास गती देण्यासाठी आणि सुचविण्यात आलेल्या बाबींवर योग्य ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, तसेच प्राधिकरण समितीचे सदस्य श्री. नितीन शिंदे, श्री. मिलिंद एकबोटे, श्री. काका धुमाळ, श्री. चंद्रकांत पाटील, श्री. पंकज चव्हाण, श्री. सदाशिव टेटविलकर, श्री. विजय नायडू, श्री. अमोल जाधव आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.किल्ले प्रतापगड हा आपल्या पराक्रमाचा, परंपरेचा आणि प्रेरणेचा साक्षीदार आहे. या ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची नवी दिशा या बैठकीत ठरविण्यात आली. 🏰







