सारथी महाराष्ट्राचा न्युज : ता.प्र. विशाल हलवले
पाटणबोरी : भारतीय कापूस महामंडळाने यावर्षी १५ ऑक्टोबरपासून खरेदी सुरू करण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने शेजारच्या तेलंगणा राज्यात भारतीय कापूस महामंडळाने अगदी त्याच दिवसापासून तेलंगणाच्या आदिलाबाद येथे कापूस खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला तसाच दिलासा विशेषतः कापूस पिकवणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना मिळाला असता तर शेतकऱ्यांचे समाधान झाले असते.
पण या शेतकऱ्यांना आपल्या गरजेपोटी केवळ पाच ते सहा हजार रुपये क्विंटल या भावात कापूस विकणे भाग पडत आहे. खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस घेण्याचा पुरेपूर फायदा घेऊन शेतकऱ्यांच्या गळचेपी केली जात आहे. घरसंसार चालविण्यासाठी गरजूं शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना आपला माल विकणे भाग पडत आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा सुकाळ साफ झाला आहे. कपाशी सुद्धा २० ते २५ टक्के पिक येण्याची शक्यता आहे.
पाटणबोरी हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असून येथे कृषि उत्पादन बाजार समिती पांढरकवडा ची उपशाखा असून येथे जिन सुद्धा आहे. तसेच या गावाला जवळपास ३५ ते ४० खेडयाचा संबंध आहे.
तेव्हा पाटणबोरी येथे सुद्धा भारतीय कापूस महामंडळाने कापूस खरेदी केंद्र सुरू करून परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. महाराष्ट्र केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असताना कापूस महामंडळाने कापूस खरेदी सुरू करण्यास उशीर का केला असा ही प्रश्न शेतकरी वर्गात विचारला जात आहे.







