वर्धा|आर्वी प्रतिनिधी ग्रामीण पत्रकार हे समाजातील अन्याय, शोषण आणि प्रशासनातील त्रुटींवर सातत्याने बोट ठेवणारे खरे लोकशाहीचे पहारेकरी आहेत. ग्रामीण भागातील वास्तव परिस्थिती विधिमंडळात मांडण्यासाठी पत्रकारांचा स्वतंत्र प्रतिनिधी असणे गरजेचे आहे. या दृष्टीने पत्रकारांनी निवेदन दिल्यास मी स्वतः राज्यपालांची भेट घेऊन ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करीन, अशी ठाम भूमिका खासदार अमर काळे यांनी व्यक्त केली.

पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पत्रकार महर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ६ जानेवारी २०२६ रोजी आर्वी (जिल्हा वर्धा) येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विदर्भातील सक्रिय पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे होते, तर उद्घाटन खासदार अमर काळे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी आमदार दादाराव केचे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, आर्वी नगराध्यक्षा स्वाती गुल्हाने, शेतकरी नेते शैलेश अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत ढोले, तहसीलदार हरीश काळे, पत्रकार संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य वक्ते राम खुर्दळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. आमदार दादाराव केचे यांनी आपल्या मनोगतात बदलत्या काळात ग्रामीण पत्रकारांवर वाढलेली जबाबदारी अधोरेखित करत लोकप्रतिनिधींना त्यांच्या परिश्रमांची जाणीव असल्याचे सांगितले. पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत ढोले यांनी पत्रकार हा समाज आणि प्रशासन यांमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे नमूद केले.
शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी ग्रामीण पत्रकार हा शेतकरी व ग्रामीण विद्यार्थ्यां प्रमाणेच उपेक्षित घटक असल्याचे सांगत, पत्रकारांच्या संरक्षणासह त्यांच्या आर्थिक व कौटुंबिक सुरक्षिततेबाबत शासनाने ठोस धोरण आखावे, अशी मागणी केली. ग्रामीण व शहरी पत्रकारांमध्ये अधिस्वीकृतीबाबत भेदभाव न करता समान न्याय देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार दिनाचे मुख्य वक्ते तथा पत्रकार संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष राम खुर्दळ यांनी ग्रामीण पत्रकारितेचे वास्तव मांडताना ग्रामीण पत्रकारांना आजही हल्लाविरोधी कायदा, विमा, पेन्शन, अधिस्वीकृती, पत्रकार भवन, घरकुल योजना व पत्रकार कल्याण निधी यापासून वंचित ठेवले जात असल्याची तीव्र टीका केली. ग्रामीण पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये त्यांना कोणतेही संरक्षण मिळत नसल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली.
कार्यक्रमात विदर्भातील सक्रिय पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच विदर्भ सहसचिव, जिल्हा प्रवक्ते व आर्वी, आष्टी व कारंजा (घाडगे) तालुक्यांतील पत्रकारांच्या नियुक्त्या जाहीर करून त्यांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप रघाटाटे यांनी केले. संचालन प्रा. कल्याणी संजय वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर्वी तालुका अध्यक्ष प्रा. राजेश सोळंकी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक पत्रकारांनी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांसाठी राज्यपालांकडे पाठपुरावा करणार – खासदार अमर काळे






