सोयगाव
सोयगाव सह तालुक्यातील जरंडी, निंबा यती,बहुलखेडा, कवली,निमखेडी, उमर विहिरे आदी परिसरात सध्या उन्हाळी ज्वारी व बाजरीचे पीक जोमात आले आहे. यंदा सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे बाजरीचे पीक हिरवेगार दिसत असून, त्यात आता दाणे भरायला सुरुवात झाली आहे, तर काही ठिकाणी बाजरीचे पीक पोटऱ्यात आले आहे. शेतकऱ्यांतून त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा परतीच्या पावसाने पिकांची नासाडी झाली. परिणामी, खाण्यायोग्य बाजरीचे पीक निघाले नाही. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीची पेरणी केली. आता हे पीकही जोमात असून, आगामी २० दिवसांत सोंगणीला येणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
— बाजरीचे वैरण उत्कृष्ट
सोयगाव सह आदी परिसरात सध्या अनेक ठिकाणी पीक फुलोऱ्यात, हुरड्यात, तर काही ठिकाणी परिपक्व होऊन काढणीला आले.उन्हाळी ज्वारी व बाजरी फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीत वाऱ्याचा वेग व तापमान अधिक असल्याने काही वाणांमध्ये परागीकरणाला अडचण येते. पावसाळ्यात पेरलेल्या बाजरीचे वैरण हे चांगल्या दर्जाचे नसते. त्यास जनावरेही खात नाहीत. मात्र, उन्हाळी बाजरीचे वैरण चांगल्या प्रतीचे आहे.
Discussion about this post