अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडू -डॉ. सुधाकर वायदंडे यांचा इशारा
शिराळा / प्रतिनिधी
महापुरुषांची बदनामी करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या,धार्मिक भावना दुखावणाऱ्या,इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नागपूर येथील प्रशांत कोरटकर याच्यावर गुन्हा नोंद करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दलित महासंघाच्या(वायदंडे गट)वतीने राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने केली आहे.
याबाबतचे निवेदन इस्लामपूर पोलिस ठाण्याचे सहा.पो. निरीक्षक किरण दिडवाघ यांना देण्यात आले यावेळी सहा.पो. निरीक्षक सागर वरुटे व उपनिरीक्षक सतीश मिसाळ उपस्थित होते.
डॉ.सुधाकर वायदंडे म्हणाले, नागपूर येथील प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी एकेरी व चुकीची भाषा वापरून बदनामी केलेली आहे. महाराजांविषयी अशी भाषा वापरून महाराष्ट्र तसेच देशातील शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत.
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांची बदनामी करणारी वक्तव्य करणे ही लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.
मराठा समाजाला शिवीगाळ करून कोरटकर याने सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच मुख्यमंत्र्यांचे नांव या फोन कॉलमध्ये आल्याने याची गांभीर्याने दखल घेऊन राज्य सरकार व पोलिस प्रशासनाने कोरटकरवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा दलित महासंघाच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ.सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.
यावेळी राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे,प.महा अध्यक्ष अशोकराव गायकवाड,प.महा कार्याध्यक्ष सदाभाऊ चांदणे,युवक प.महा अध्यक्ष सुनिल मोरे सर,कामगार आघाडी प.महा अध्यक्ष संभाजी मस्के,भटक्या जाती विमुक्त जमाती आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाब सय्यद,कोल्हापूर युवक कार्याध्यक्ष सागर लोंढे,वाळवा ता.अध्यक्ष नारायण वायदंडे, शिराळा ता. अध्यक्ष प्रभाकर तांबीरे,आष्टा शहर उपाध्यक्ष अमोल लोखंडे,वाळवा ता. कार्याध्यक्ष राजेश वायदंडे,हातकणंगले युवक अध्यक्ष गोरख सावंत,नंदू दाभाडे,धीरज वारे,रमेश कांबळे यांच्या उपस्थित होते.
Discussion about this post