पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी)
सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे लागणार, मृतांची नावे होणार कमी!
‘१०० दिवस कृती आराखडा मोहिमे’ अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावरती १ मार्च पासून जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात आली होती. अतिशय प्रचंड असा प्रतिसाद या मोहिमेला लाभला आणि हीच मोहीम राज्यभर राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून १९ मार्च २०२५ रोजी नवीन जीआर काढून मंजुरी दिलेली आहे.
सातबाऱ्यावरील मयताच्या नावांमुळे अनेकांना खरेदी-विक्री व्यवहार, कर्ज प्रकरणासह अनेक अडचणी येतात. सातबाऱ्यावरील ही अडचण दूर करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या १०० दिवसाच्या कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत १ एप्रिलपासून राज्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
तहसीलदार तालुका समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच जिल्हाधिकारी यांची ‘नियंत्रण अधिकारी’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ते मोहिमेचे निरीक्षण करतील आणि अडचणी सोडवतील. प्रत्येक सोमवारी मोहिमेचा प्रगती अहवाल ई-मेलद्वारे सादर करावा लागेल.
असे असेल मोहिमेचे वेळापत्रक –
१ ते ५ एप्रिल – तलाठी गावात येऊन मयत खातेदारांची यादी तयार करतील.
६ ते २० एप्रिल – वारसांनी आवश्यक कागदपत्रे, जसे मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, ग्रामसेवक किंवा सरपंच यांचा दाखला, रहिवासी पुरावा आणि संपर्क माहिती तलाठ्यांकडे सादर करावी.
२१ एप्रिल ते १० मे – तलाठी यांनी ई- फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा.
Discussion about this post