पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात अनेक पतसंस्थांकडून ठेवीदारांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशातच आता माजलगाव येथील धनकेश्वर अर्बन निधीने जास्त व्याजदराचे अमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
माजलगाव शहरातील धुनकेश्वर अर्बन निधी पतसंस्थेने जास्त व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांकडून ४० लाख रुपयांची फसवणूक केली. त्रिंबक यादव यांनी २१लाख ८४ हजार रुपये, कौशल्याबाई यादव यांनी ८ लाख ३ हजार रुपये, आणि कावेरी खेत्री यांनी १० लाख ३७ हजार रुपये या पतसंस्थेत ठेवले होते. मात्र, अनेक वेळा मागणी करूनही ठेवी परत दिल्या नाहीत आणि वारंवार टाळाटाळ करण्यात आली.

परंतु, पैसे परत मिळत नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांना याबाबत माहिती देऊनही तक्रार दाखल होत नसल्याने त्रिंबक यादव यांनी ऍडव्होकेट नारायण गोले यांच्यामार्फत सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर धुनकेश्वर अर्बन निधीचे अध्यक्ष शिवहरी यादव, उपाध्यक्ष सचिन रोडगे आणि इतर सदस्यांविरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post