सोयगाव
तालुक्यातील घोरकुंड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतुन लपवलेल्या अवैध देशी दारूच्या बाटल्या चक्क शालेय विद्यार्थिनीने पोलिसांच्या समक्ष काढून दिल्या होत्या.तरीही बनोटी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने बनोटी पोलीस निष्क्रिय असल्याचा ठपका महिलांनी ठेवला.तसेच सोमवारी आक्रमक झालेल्या महिलांनी थेट सोयगाव पोलीस ठाण्यात धडक मोर्चा काढून घोरकुंड गावातील अवैध देशी दारूची होणारी तीन ठिकाणी विक्री बंद करण्याच्या मागणी केली.यावेळी शेकडो महिलांनी वज्र मूठ आवळली होती.
सोमवारी दुपारी एक वाजता सोयगाव पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांना निवेदन देत गावातील अवैध देशी दारूची विक्री फोफावली आहे.बनोटी पोलीस कोणतीही कारवाई करत नाही असा प्रश्न उपस्थित करत महिलांनी दोन तास ठिय्या मांडला होता.
घोरकुंड गावात गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या परिसरात अवैध देशी दारूची सर्रास विक्री सुरू आहे. शाळेच्या समोर, शाळेच्या पाठीमागे व नदीच्या पात्रात या अवैध विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे.त्यामुळे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मोठा त्रास होत आहे. तळीराम शाळेच्या भोवती धिंगाणा घालतात तसेच शेतात ये जा करणाऱ्या महिलांना नदीच्या पात्रात जातांना व येतांना त्रास होतो.त्यामुळे गावातील अवैध दारूची विक्री बंद करावी यासाठी घोरकुंड गावात शेकडो महिलांनी वज्रमूठ आवळली आहे.
त्यासाठी सोमवारी थेट सोयगाव पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांना कैफियत मांडली.
चौकट :
बनोटी दुरक्षत्राचे पोलीस अधिकारी या अवैध दारू विक्रेत्यांना पाठीशी घालत असल्याचा ठपका महिलांनी ठेवला असून दोन दिवसात गावातील अवैध दारू विक्री बंद न झाल्यास सोयगाव पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी थेट मागणी निवेदनात केली आहे.
चौकट
तालुक्यातील अवैध धंदेही बंद करा
सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे फोफावली आहे घोरकुंड गावात तालुक्यातून इतर ठिकाणावरून देशी दारूचा पुरवठा होतो त्यामुळे सोयगाव तालुक्यातील अवैध धंदेही बंद करावे अशीही जोड मागणी निवेदनात आक्रमक महिलांनी केली आहे.
चौकट;-गावात अवैध देशी दारू बंद साठी मतदान घेण्यासाठी या आक्रमक महिला तयार झालेल्या असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडेही या महिलांनी सोमवारी सायंकाळी निवेदन दिले आहे.
निवेदनावर भारती बाई साबळे, स्वाती साबळे,कविता साबळे,वर्षा पठाडे,कल्पना साबळे, कविता पठाडे,निकिता काकडे,सुमनबाई पठाडे,भारती भोई,वर्षा भोई,नवसरा मोरे,सविता साबळे, सुवर्णा भोई,ज्योती बनकर,सुनीता साबळे आदींसह दोनशे हुन अधिक महिला सोयगाव पोलीस ठाण्यात होत्या अखेर निवेदन दिल्या वर पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी अवैध दारू विक्री विरोधात वॉश आउट मोहीम राबविणार असल्याचे आश्वासन दिले.
Discussion about this post