जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे /२५ मार्च २०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मुंगेवाडी गाव वर्षानुवर्षे पाणी टंचाईचा सामना करत आहे. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज भर उन्हात लांब पायपीट करावी लागते. विशेष म्हणजे मुंगेवाडीचा समृद्ध राजकीय वारसा असूनही या गावाचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. नागोबाचीवाडी आणि मुंगेवाडी हे दोन्ही एकाच वॉर्डमध्ये येतात, आणि याच गावाला दोन वेळा खर्डा ग्रामपंचायतिचे सरपंचपद प्राप्त झाले आहे. सध्या या हद्दीत सध्या विराजमान उपसरपंच पददेखील आहे, परंतु पाणी उपलब्धतेचा प्रश्न प्रलंबितच राहिल्याने महिला आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी व मागील कार्यकाळातच खर्डा हद्दीतील नागोबाचीवाडीलाही खर्डा ग्रामपंचायतिचे सरपंचपद मिळाले होते, त्यामुळे नागोबाचीवडी व त्याच वार्डातील मुंगेवाडीला स्थानिक पातळीवर राजकीय सक्रियता तर दिसून येते. परंतु, नागरिकांनी वारंवार या समस्येकडे लक्ष वेधूनही पाणी योजनांवर कोणतीही ठोस कृती झालेली नाही. परिणामी, पाणी समस्येवर तोडगा निघाला नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या परिस्थितीतून वैतागलेल्या स्थानिक नागरिकांनी आता उपोषणाचा इशारा दिला आहे. “आमच्या गावातील सरपंच आणि उपसरपंचांनी जर गेल्या अनेक वर्षांत पाणीच उपलब्ध करून दिले नाही, तर त्यांनी पदे धारण करण्याचा उपयोग काय?” असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, खर्डा हद्दीतील इतर पदाधिकारी जलजीवन प्रकल्पांसाठी उपोषण करत आहेत, तर मुंगेवाडीतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींवर जबाबदारीची भावना वाढविण्याची गरज आहे.
Discussion about this post