अयोध्यानगरीत पोहोचत प्रभू श्री. रामचंद्रांच्या दर्शनाचा अनोखा योग साधला.
आज २४ मार्च, आजच्या दिवशीच तारखेनुसार येणारा वाढदिवस. परंतु; माझ्यासह कार्यकर्तेही हा वाढदिवस तिथीनुसार म्हणजेच प्रभू श्रीराम नवमीलाच साजरा करतात. दरम्यान; तारखेदिवशीच्या वाढदिनी अयोध्यानगरीत पोहोचत प्रभू श्री. रामचंद्रांच्या दर्शनाचा अनोखा योग साधला. तसेच; ५- मराठा बटालियनच्या वर्धापनदिन कार्यक्रमालाही उपस्थिती लावली. कागल तालुक्यातील साके येथील रहिवाशी असलेले व ऑनररी लेफ्टनंट पदावर काम करीत असलेल्या संतोष चौगुले यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी, हे घडलेही निव्वळ योगायोगानेच. अयोध्या नगरीत ५- मराठा बटालियन इन्फंट्रीचे युनिट तैनात आहे. आज या बटालियनचा २२५ वा वर्धापन दिन आहे. ५- मराठा इन्फंट्री बटालियनच्या वर्धापन दिनानिमित्त कागल तालुक्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील बटालियनचे जवान, अधिकारी आणि आजी-माजी सैनिक आठवड्यापूर्वीच मला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी आजी-माजी सैनिकांनी पाच मराठा बटालियन इन्फंट्रीचा वर्धापनदिन २४, २५ आणि २६ मार्च रोजी होत असल्याचे सांगत कार्यक्रमाला अयोध्येला येण्याची विनंती केली. सैनिकांची ही विनंती स्वीकारलीही.
यावेळी कर्नल श्री. जगदाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा भेट देऊन बटालियनच्यावतीने सत्कार केला. दरम्यान; जवानांबरोबर स्नेहभजन केले.
दरम्यान; तिथीनुसार येणाऱ्या वाढदिनी म्हणजेच प्रभू श्रीरामनवमी (दि. सहा एप्रिल) दिवशी कुटुंबीयांसमवेत अजमेर येथील दर्ग्याचे दर्शन घेणार आहे.
यावेळी उपस्थित जवान व अधिकाऱ्यांनी माझ्याप्रती यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामविकास मंत्री म्हणून कार्यरत असताना सर्व आजी-माजी सैनिकांसाठी केलेली मालमत्ता कराची सूट तसेच; कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना केलेली मदत आणि शहीद जवानांची स्मारके व स्मृती कमानी याबद्दल सैनिकांनी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या.
प्रभू श्री. रामचंद्रांनी मला अयोध्येला बोलावल्याशिवाय असा योगायोग घडून येणे शक्यच नाही. माझा तारखेनुसार येणारा २४ मार्च हा वाढदिवस, ५ – मराठा बटालियन इन्फंट्रीचा वर्धापन दिन आणि प्रभू श्री. रामचंद्रांची राजधानी अयोध्यानगरी हा सर्वच एक मोठा योगायोग आहे. त्यामुळेच “प्रभू श्री. रामचंद्रने मुझे बुलाया है……” या भावनेतून मी अयोध्येत पोहोचलो, प्रभू श्री. रामचंद्रांचे मनोभावे दर्शन घेतले आणि धन्य झालो……!
यावेळी गोकुळ दूध संघाच्या संचालक युवराज पाटील, के. डी. सी. सी. बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, प्रवीण काळबर, बाळासाहेब तुरंबे आदी प्रमुख उपस्थित होते.
Discussion about this post