लातूर, उदगीर (प्रतिनिधी) – लातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या ३ कोटी ३२ लाख ६८ हजार रुपयांचा निधी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठास वर्ग करण्याचा शासन आदेश जारी झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रुग्णालयाच्या कामाला गती मिळणार असून, लवकरच रुग्णसेवा सुरू होणार आहे, असा विश्वास माजी मंत्री व आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
माजी मंत्री देशमुख यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा करून जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या निधीला मंजुरी मिळाली असून, त्याचा शासन आदेशही जारी करण्यात आला आहे.
लातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीसाठी यापूर्वीच निधी मंजूर झाला असून, लवकरच काम पूर्ण होऊन जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल. यासाठी सहकार्य करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि संबंधित मंत्र्यांचे अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.
Discussion about this post