तुमसर :–‘स्वच्छ पाणी’ हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, पण तुमसरकरांना आजही तो हक्क मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे. शहरात पाण्याच्या नावाने पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. अभ्यंकर नगर, सुभाष चौक येथील श्रीरामजी चाचीरे यांच्या घरात मंगळवारी सकाळी ७.१५ वाजता अळी युक्त, गढूळ आणि पिवळसर पाणी नळामार्फत पुरवण्यात आले.
नागरिक संतप्त आहेत, आणि संतापाला कारणही ठोस आहे — ४७ कोटी रुपयांचा खर्च करून टाकण्यात आलेली नवीन पाईपलाईन ही केवळ कागदोपत्री यशस्वी ठरली आहे का?पाणी पिण्यायोग्य असावे ही सर्वात प्राथमिक अपेक्षा, पण जर त्या पाण्यात अळी सापडते, तर हे केवळ हलगर्जीपणाचे लक्षण नाही, तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याचे स्पष्टपणे दिसते.
नगरपरिषद प्रशासन, पाणीपुरवठा विभाग, मुख्याधिकारी – यांचा एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा खेळ सुरू आहे. पण या साऱ्यांत भरडले जात आहेत ते सामान्य नागरिक.
—–@—–
“ही नगरपालिका की भ्रष्टाचाराचं अड्डं?”
४७ कोटी खर्चूनही पाणी असा मिळतोय तर प्रश्न विचारला जातोय – हे सरकार आहे की केवळ दलालांचा तमाशा?
फेसबुक, व्हॉट्सॲप स्टेटसवर सक्रिय असणारे आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष – आज कुठे आहेत? लोक रस्त्यावर उतरले की मगच डोळे उघडणार का?
—-@—–*
नागरिक आक्रमक : कारवाई न झाल्यास आंदोलन अटळ
“नळ टॅक्स आम्ही वेळेवर भरतो, पण पाणी आमचं आरोग्य धोक्यात घालणारं मिळतं. ही फसवणूक आहे,” असं म्हणत नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
जर तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही, तर नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत
पाण्याच्या प्रत्येक थेंबात जनतेचा रोष उसळतो आहे… आता वेळ आहे ‘कारवाई’ची, नाहीतर संतापाचे लाट उठणार, आणि ती थेट प्रशासनाला उध्वस्त करेल!

Discussion about this post