आत्ताच्या काळामध्ये मोबाईल ही गरजेपेक्षा व्यसन बनले आहे. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण त्यामध्ये अडकला आहे. मोबाईलच्या व्हिडिओमुळे लहान मुले त्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे लहान मूल रडू लागले की त्याचे लक्ष वळविण्यासाठी आई-वडील त्यांच्यासमोर मोबाईल ठेवतात. पण, आत्ता हाच मोबाईल चिमुकल्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम करीत आहे. लहानवयातच मोबाईल हातामध्ये पडत असल्याने या चिमुकल्यांची विचार करण्याची क्षमता आणि विकास खुंटत आहे.
सोशल मीडियावर अशुद्ध भाषेतील रिल्सचा भडिमार असून, या रिल्स सतत बघण्यात आल्याने चिमुकल्यांच्या मातृभाषेवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. रिल्समधील याच अशुद्ध भाषेचा वापर काही लहान मुले संवाद साधण्यासाठी करीत असल्याच्या घटना घडत आहेत.सध्या समाजामध्ये नोकरी, धंद्यामुळे अनेक कुटुंबे विस्थापित होऊ लागली आहेत. तसेच विभक्त कुटुंब पद्धती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक घरामध्ये आई-वडील आणि त्यांचे मूल इतकेच लोक असतात. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आणि आई-वडिलांना वेळ देता येत नसल्याने ती एकलकोंडी होतात. आई-वडील नोकरी निमित्ताने घराबाहेर पडत असल्याने मुलांकडे त्यांना फारसे लक्ष देता येत नाही.
संस्कार करणारे, गोष्टी सांगणारे आजी-आजोबा घरात नसल्याने ही लहान मुले मोबाईलच्या भावविश्वात रमून कोमेजून जात आहेत. लहान मूल रडू लागले की त्याला शांत करण्यासाठी त्याला मोबाइलवर कार्टुन किंवा रिल्स लावून देण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. काही लहान मुले तर मोबाईल समोर ठेवल्याशिवाय अन्नाचा एक कणदेखील खात नसल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे मुलांच्या विचारसरणीसह बोलण्यावर विपरीत परिणाम होत आहे.
काय करणे आवश्यक…
लहान मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे ते एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहतात. त्यामुळे त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास खुंटत आहे. लहान मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लठ्ठपणा, चिडचिडेपणा वाढत आहे. त्यामुळे सर्वांत महत्त्वाचे आहे की, आई-वडिलांनी मुलांना वेळ देणे. यामुळे आपले मूल काय बोलते, कसे बोलते, हे लक्षात येते. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, मुलांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांच्या कल्पकवृत्तीला चालना देण्यात येईल, असे खेळ आणि उपक्रम त्यांना द्यावेत, जेणे करून त्यांची मानसिक आणि शारीरिक विकास चांगल्या पद्धतीने होईल.
सहा वर्षांपर्यंतच्या मुलांवर चुकीचे संस्कार
सहा वर्षांपर्यंतच्या मुलांवर भाषेचा आणि विचारांचा संस्कार होणे गरजेचे असते. या काळात त्यांना शुद्ध भाषा आणि उच्चार शिकवणे महत्त्वाचे असते. या वयात त्यांचे उच्चार आणि विचार करण्याची क्षमता वाढत असते. त्यांचा मेंदू विकसित होत असताना त्याला चांगल्या गोष्टी शिकविणे गरजेचे असते. पण, याच काळात या मुलांच्या हातात मोबाईल दिला गेल्यामुळे त्यांचे विचार आणि उच्चार करण्याची क्षमता प्रभावित होते. सध्या सोशल मीडियावर अशुद्ध भाषेतील, शिवीगाळ असलेल्या रिल्सचा भडिमार सुरू आहे. अशा रिल्स सतत बघितल्याने अशुद्ध भाषा ही लहान मुलांच्या शिकण्याचा भाग बनू लागली आहे. सतत अशुद्ध शब्द कानावर पडल्याने तेच शब्द बोलण्यातदेखील येऊ लागले आहेत. त्यामुळे भाषेची शुद्धता ही घटत आहे. काही मुले ही मातृभाषा सोडून अशुद्ध भाषा बोलताना दिसत आहेत, असे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Discussion about this post