पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी)
धारूर तालुक्यातील आदर्श गाव आवरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग म्हणून योग स्वीकारला पाहिजे, हा संदेश देत योगशिक्षक पांडुरंग जगताप मागील चार वर्षांपासून विद्यार्थ्यांना निःस्वार्थ भावनेने योग, प्राणायामचे धडे देत आहेत.

आज अकरावा योग दिवस पूर्ण जगभरामध्ये साजरा केला जात आहे. यावर्षी एक पृथ्वी एक आरोग्य ही योग दिन थीम आहे. योग अंगीकारल्यास अनेक शारीरिक व मानसिक विकार दूर होण्यास मदत होते. तसेच योग केल्याने जीवनातील दैनंदिन प्रश्नांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी मनोबल प्राप्त होते. आरोग्य, मनशांती, व्यक्तिमत्व विकास नैतिकता अशा सर्वांगीण उन्नतीसाठी व बौद्धिक विकासासाठी योग आवश्यक आहे.

योग, प्राणायाम एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी याला आपल्या दैनंदिनी मध्ये समाविष्ट करावे. योग शिक्षक पांडुरंग जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी योग चे महत्व पटवून सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. फरके सर व शिक्षिका भालेराव मॅडम उपस्थित होत्या. आजच्या योग दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना योग म्हणजे काय? योग चे प्रकार? याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच महर्षी पतंजलींनी सांगितलेला अष्टांग योग त्यामधील योगची आठ अंगे जसे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करण्यात आले.

आजच्या अकराव्या योग दिन कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली व समारोप शांतीपाठ ने करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी योग ला आपल्या जीवनामध्ये सामाविष्ट करण्याचा संकल्प केला.