प्रतिनिधी सुप्पा (ता. गंगाखेड) – पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, या उद्देशाने सुप्पा येथील ज्ञानज्योत माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात विविध प्रकारची फळझाडे, औषधी वनस्पती व छायादायक झाडांचे रोपण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. इमडे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व, तापमान नियंत्रण, प्रदूषण नियंत्रण आणि पाण्याचे संवर्धन याबाबत सखोल माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करण्याचे आवाहनही केले.
या उपक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन परिसर हिरवळाने सजवण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे संयोजन शिक्षक मंडळींच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल, असा विश्वास मुख्याध्यापक इमडे सर यांनी व्यक्त केला.