प्रतिनिधी – प्रमोद जमादार (7775887173)
गोंडऊमरी/रेल्वे: केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर दिल्याने आता ग्रा.पं.च्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळेच ग्रा.पं.च्या कारभारात पारदर्शकता असावी व या सर्व कारभाराची माहिती ग्रामस्थांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी पंचायत राज मंत्रालयाने तंत्रज्ञानाचे एक पाऊल पुढे टाकत ‘मेरी पंचायत’ हे अॅप आणले आहे. या अॅपमुळे गावाच्या कारभाराची सर्व माहिती प्रत्येक ग्रामस्थाला सहज पाहता येणार आहे.
डिजिटल युगात आता स्थानिक स्वराज्य संस्थाही मागे नाहीत. हे ‘मेरी पंचायत’ अॅपने दाखवून दिले आहे. ग्राम पंचायतींचा विकास झपाट्याने होऊ लागला असून केंद्र व राज्य सरकारकडून आता पंचायतींना थेट निधी मिळू लागला आहे. या निधीमुळे ग्रामीण प्रशासन गावातील कामे सहजरीत्या पूर्ण करू शकत आहे.सरकारकडून गावासाठी किती निधी उपलब्ध झाला आहे, गावामध्ये सध्या कोणकोणती कामे सुरू आहेत, कोणकोणत्या योजना सुरू आहेत, याची सर्व माहिती अॅपद्वारे प्रत्येकाला मिळू शकेल. ग्रामस्थांना ही माहिती मिळवण्यासाठी ग्रा.पं. मध्ये हेलपाटे घालावे लागणार नाहीत. केवळ माहितीच नाही तर अॅपच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामपंचायतीचा सामाजिक व आर्थिक लेखाजोखा देखील तपासून पाहता येणे शक्य होणार आहे.
ग्रा.पं. मधील संख्या, समित्यांची सदस्य माहिती, समित्यांचे अध्यक्ष, नोटीस बोर्ड, ग्रा.पं. तीला मिळणारे अनुदान याबरोबरच ग्रा.पं.ची एकूण बँक खाती किती आहेत, त्यामध्ये शिल्लक रक्कम व प्रत्येक कामासाठी खर्च झालेली रक्कम
याशिवाय कामाची सद्यस्थिती वेगवेगळी देयके, पाण्याचे स्त्रोत, नळजोडणी, पाणी तपासणी अशी सविस्तर माहिती प्रत्येक ग्रामस्थाला अॅपवर पाहता येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराची सर्व कुंडलीच ग्रामस्थांपुढे उघड होणार आहे. गावांच्या विकासावर भर देण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असून ‘मेरी पंचायत’मुळे कारभार अधिकाधिक पारदर्शक होईल
अभिप्राय देण्याची सुविधा
ग्रामपंचायतीमध्ये जी कामे सुरू आहेत अथवा ज्या काही योजना आहेत त्यामध्ये त्रुटी असल्यास किंवा कामाचे कौतुक करावयाचे असल्यास त्याबाबतचे फोटोही अपलोड करता येणार आहेत. ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ 250 शब्दांमध्ये आपला चांगला किंवा वाईट अभिप्राय यावर देऊ शकतील. त्यामुळे प्रशासनालादेखील गावामध्ये काय सुरू आहे, याची माहिती मिळू शकेल.