
पुणे जिल्हा प्रतिनिधी: अविनाश घोगरे
वात्सल्य सिंधू फाउंडेशनने दिलेला सन्मान आमच्यासाठी लाख मोलाचा आहे, अशा शब्दांत तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रगती संस्थेच्या फेलो प्राची कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ‘समतेचा दीप शाहू विचारांचा मेळावा’ या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त वात्सल्य सिंधू फाउंडेशन आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्राची कांबळे आणि प्रेरणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा शुभांगीताई जोगी यांना ‘अस्तित्व गौरव सन्मान’, तर डॉ. राजाभाऊ भैलुमे यांना ‘राजश्री शाहू महाराज गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना प्राची कांबळे यांनी सांगितले की, “आजही तृतीयपंथीयांबाबत समाजात नकारात्मक भावना आहे. मात्र संविधानाने आम्हालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मी शिकले तसे आमच्या पंथातील प्रत्येकाने शिक्षणाचा मार्ग स्वीकारावा, हीच माझी अपेक्षा आहे.”
त्यांनी पुढे म्हटले की, “समाजाने दूर लोटले असतानाही वात्सल्य सिंधू फाउंडेशनने केलेला हा सन्मान आम्हाला आत्मसन्मान देणारा आहे. तो आमच्यासाठी लाखमोलाचा आहे. हा सन्मान म्हणजे सामाजिक सहिष्णुतेचे प्रतीक आहे.”
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुवर्णाताई लोळगे, माजी नगरसेविका कविताताई वाटमारे, दक्षता समितीच्या जिल्हा सदस्य शोभाताई पाचंगे, कोरो इंडिया विभागीय प्रमुख राधाताई कांबळे, आम्ही शिरूरकर फाऊंडेशन अध्यक्ष रविंद्र बापू सानप, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, ज्योती पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनंदा लंघे यांनी प्रास्ताविक करताना फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा आढावा सादर केला. त्यांनी सांगितले की, “वात्सल्य सिंधू फाउंडेशनने समाजातील अनेक उपेक्षित घटकांना आधार देण्याचे काम सातत्याने केले असून, विविध सामाजिक स्तरांतील व्यक्तींना संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
फाउंडेशनच्या सचिव उषा वाखारे यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार मानले. तसेच फाउंडेशनच्या फेलो प्रेरणा वर्मा व पवित्रा गाडेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोलाचे योगदान दिले.