बार्शी – वाणेवाडी येथील रहिवासी व पोतराज म्हणून परिचित असलेल्या रावण सोपान खुरंगुळे (वय ७०) यांचा त्यांच्या मुलाकडून काठी व पोतराजाच्या वाकीने मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बैल विकलेले पैसे न दिल्याने मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना ६ जुलै २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली.
फिर्यादी राहुल नारायण लोखंडे (वय ३३), पोलीस पाटील, रा. वाणेवाडी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी सकाळी गावकऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर सरपंच पती बापूसाहेब गरदडे व काही ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा रावण खुरंगुळे हे घरासमोर रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याला व कानावर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर शरीरावर मारहाणीचे वळ देखील स्पष्ट दिसून येत होते. त्यांच्या शेजारी एक काठी आढळून आली.
दरम्यान, मृत रावण खुरंगुळे यांचा मुलगा अनंतराव उर्फ अनिल हा घरात झोपलेला आढळून आला. जेव्हा ग्रामस्थांनी त्याला विचारणा केली, तेव्हा त्याने “मरू दे त्याचा आयला, त्याने काल बैलं विकले, पण मला पैसे दिले नाहीत, म्हणून मीच त्याला काठी व वाकीने मारहाण केली,” असे सांगून खुनाची कबुली दिली.
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपी अनंतराव उर्फ अनिल रावण खुरंगुळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने वाणेवाडी गावात शोककळा पसरली असून पित्याचा मुलाकडून खून झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.