नवरात्र जत्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात; पालखी सोहळ्याने चिकोत्रा खोरे दुमदुमले
भुदरगड प्रतिनिधी :
निसर्गरम्य चिकोत्रा नदीच्या कुशीत वसलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दिंडेवाडी पठारावर श्री भावेश्वरी देवी अर्थात आई भागूबाई यांचा नवरात्र जत्रोत्सव उत्साहात साजरा होत आहे. आदिशक्तीचे रूप आणि स्थानिक ग्रामस्थांची लोकमाता म्हणून पूजल्या जाणाऱ्या आई भागूबाईच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी पठारावर मोठी गर्दी केली आहे. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, ‘आई भागूबाईच्या नावानं चांगभलं!’ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
वात्सल्यमूर्ती माता आणि रक्षक देवतेची आख्यायिका
हिंदू धर्मपरंपरेत आदिशक्तीचे रूप मानल्या जाणाऱ्या भावेश्वरी देवीला स्थानिक लोकपरंपरेत प्रेमाने ‘आई भागूबाई’ असे संबोधले जाते. पूर्वी हा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला असताना देवीने वृद्ध मातेच्या रूपात गुराख्यांना दर्शन दिले, अशी स्थानिक श्रद्धा आहे. गावकऱ्यांवर संकटे आल्यास देवी त्यांचे रक्षण करते, अशी भाविकांची धारणा आहे. दिंडेवाडीच्या उंच पठारावरील पवित्र शिळेच्या रूपात देवीचे स्थान असल्याने या परिसराला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
पहिली निमंत्रण पत्रिका देवीच्या चरणी
चिकोत्रा खोऱ्याचे संकटांपासून रक्षण करणारी आणि नवसाला पावणारी देवी म्हणून आई भागूबाईची ख्याती आहे. परिसरातील अनेक कुटुंबांमध्ये कोणतेही शुभकार्य ठरल्यावर पहिली निमंत्रण पत्रिका देवीच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा आजही श्रद्धेने जपली जाते. देवीच्या दर्शनासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी नवरात्रोत्सवाच्या काळात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
पालखी सोहळ्याने वातावरण भक्तिमय
नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या पालखी सोहळ्यात ‘आई भागूबाईच्या नावानं चांगभलं!’ असा जयघोष करण्यात आला. पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशांचा निनाद आणि गुलालाची उधळण अशा उत्साही वातावरणात देवीची पालखी गावातून फिरवण्यात आली. या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.
धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
जत्रोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्री भावेश्वरी देवी देवस्थान कमिटीच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. उत्सव यशस्वी करण्यासाठी कमिटीचे सदस्य, दिंडेवाडीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
देवस्थान कमिटीच्या वतीने मंदिरात महाप्रसादासह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या उत्सवात सहभागी होऊन दर्शन, महाप्रसाद आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.









