पोलीस अधीक्षकांसह जिल्हा प्रशासनाला निवेदन; कारवाई न झाल्यास अकोल्यात ठिय्या आंदोलनाचा इशारा
पातूर | प्रतिनिधी
पातूर तालुक्यातील अंधारसांगवी गावात कथित अवैध आणि संशयित विषारी दारूविक्रीमुळे अनेक कुटुंबांना सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप गावातील आदिवासी महिलांनी केला आहे. गावातील अवैध दारूविक्री तातडीने बंद करून अंधारसांगवीसह परिसरातील गावांमध्ये दारूबंदी लागू करण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी महिलांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संबंधित अधिकारी तसेच चान्नी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
निवेदनात नमूद केल्यानुसार, दारूच्या व्यसनामुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तींचे उत्पन्न वाया जात असून महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याचा परिणाम मुलांचे शिक्षण, कौटुंबिक शांतता आणि महिलांच्या सुरक्षिततेवर होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. तसेच संशयित विषारी दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीविताला धोका निर्माण होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
“दारूबंदी कधी होणार? आमच्या संसाराचे वाटोळे झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल उपस्थित करत महिलांनी अवैध दारूविक्रीविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, दारूचा साठा जप्त करावा, संशयित दारूचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि या व्यवसायाला कोणाचे संरक्षण आहे का, याची निष्पक्ष चौकशी करावी, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
अंधारसांगवीसह चोंढी, नवेगाव, उंबरवाडी, सावरगाव, कार्ला, आलेगाव आणि पिंपळडोळी या गावांमध्ये अवैध दारूविक्रीविरोधात विशेष मोहीम राबवावी. तसेच नियमित पोलीस गस्त आणि अचानक तपासणी करून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.
कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा
महिलांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास अकोला येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर सौ. मीना शिंदे, सौ. यशोदा शिंदे, सौ. मुक्ता शिंदे, सौ. वनिता ठोके, सौ. नंदाबाई देवकर, सौ. दुर्गा ठोके यांच्यासह अन्य महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
“अवैध दारूविक्री बंद करा, महिलांचे संसार वाचवा आणि आमची गावे व्यसनमुक्त करा,” अशी आर्त मागणी अंधारसांगवीतील आदिवासी महिलांनी केली आहे. या तक्रारीची पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दखल घेऊन कोणती कारवाई केली जाते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.









