वैजापूर (प्रतिनिधी): वैजापूर तालुक्याच्या लगत असलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाकळीभान तीर्थक्षेत्र येथे १५ मार्च रोजी भव्य व दिव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने संत-महंत, धर्मगुरू आणि भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या संमेलनामध्ये बालसंस्कार, धर्मसंस्कार, गोरक्षण, धर्मजागरण, गुरुकुल शिक्षण पद्धती, अध्यात्म-संस्कृती तसेच मातृशक्तीचा जागर अशा विविध विषयांवर संत-महंत व प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या टाकळीभान या पावन भूमीला प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पवित्र झाल्याची मान्यता आहे. अनेक संत-महात्म्यांनी येथे वर्षानुवर्षे तपश्चर्या केल्याने या गावाला संतांची परमभूमी म्हणूनही ओळखले जाते. अध्यात्मिक क्षेत्रात या गावाचे विशेष स्थान असून येथे अन्नदान, कथा-कीर्तन, ग्रंथ पारायण, दिंडी-मिरवणुका असे धार्मिक उपक्रम सतत सुरू असतात.
या हिंदू संमेलनात हजारो धर्मप्रेमी, टाळकरी, वारकरी, शिवप्रेमी तसेच विविध पंथातील हिंदू बांधव सहभागी होणार आहेत. विशेषतः माता-भगिनी, तरुण-तरुणी यांची उपस्थिती लक्षणीय असणार असल्याचे सांगण्यात आले.
तसेच या सोहळ्यास अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.








