अंबाजोगाई तालुक्यातील उजनी येथे बकरी ईदचा सण उत्साहपूर्ण आणि शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच गावात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. मुस्लिम बांधवांनी ईदनिमित्त नवीन वस्त्रे परिधान करून ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज अदा केली.
नमाज पठणानंतर राज्यात शांतता, बंधुता आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी विशेष दुआ करण्यात आली. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
बकरी ईदच्या निमित्ताने गावात सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे सुंदर दर्शन घडले. नागरिकांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. विविध समाजातील नागरिकांनीही मुस्लिम बांधवांना भेटून शुभेच्छा देत सामाजिक सलोखा जपला.
यावेळी गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवला होता. सण शांततेत आणि उत्साहात पार पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.











