जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड
संगमेश्वर, दि. १९ ऑक्टोबर : संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कसबा-संगमेश्वर येथील १९ वर्षांखालील मुलांच्या खो-खो संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी डेरवण येथे आयोजित या स्पर्धेत संघाने सर्व सामने जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. या विजयामुळे संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, कोल्हापूर विभागीय स्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी खेळाडूंना मिळाली आहे.
कसबा हायस्कूलने शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपराही कायम राखली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळात प्रावीण्य मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जात असल्याचे या यशातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजयामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विजयी खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. आगामी विभागीय स्पर्धेतही संघाने उत्तम कामगिरी करावी, यासाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.








