एकाच महिन्यात तिसऱ्या पुरस्काराची घोषणा; सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारितेतील योगदानाचा गौरव
मुंबई, कांदिवली पश्चिम : ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार आणि सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्या रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. श्री रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक येथील लायन्स क्लब, आयटीआय सिग्नल, सातपूर रोड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्काराबाबत संस्थेच्या अध्यक्षा अरुणा दरगुडे, उपाध्यक्षा शिल्पा झरेकर, सचिव रंगनाथ दरगुडे, कोषाध्यक्ष डॉ. संकेत नागरे आणि उपाध्यक्षा अनिताताई नागरे यांनी निवडपत्राद्वारे भारत कवितके यांना कळविले आहे.
ऑक्टोबर महिन्यात तिसऱ्या पुरस्काराचा मान
भारत कवितके यांना चालू ऑक्टोबर महिन्यात जाहीर झालेला हा तिसरा पुरस्कार आहे. ४ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे त्यांच्या ‘आयुष्य उसवताना’ या आत्मचरित्राला ‘महात्मा गांधी साहित्य भूषण पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी ठाणे येथे दैनिक झुंजार केसरीच्या वर्धापनदिनानिमित्त गीतलेखन क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना ‘जगदीश खेबुडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. आता सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना ‘अहिल्या रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे.
सामाजिक कार्यातून जनसेवेचा वसा
भारत कवितके हे रुग्णालयीन सेवांसाठी मदत करणे, नागरिकांना शासकीय दाखले मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे, वधू-वर मेळाव्यांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, आरोग्य शिबिरांचे आयोजन, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्याने, महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न आणि शासकीय योजनांची माहिती समाजबांधवांपर्यंत पोहोचविणे, अशा विविध सामाजिक उपक्रमांत सातत्याने कार्यरत आहेत. कांदिवली येथील धनगर समाज विकास महामंडळाचे प्रवक्ते म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत.
साहित्य आणि गीतलेखन क्षेत्रातही ठसा
भारत कवितके यांची आतापर्यंत अकरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या लेखणीतून साकारलेली ३४ गाणी यूट्यूबवर प्रसारित झाली असून, अभंगापासून लावणीपर्यंत विविध प्रकारच्या गीतलेखनातून त्यांनी रसिकांची पसंती मिळवली आहे. महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या बातम्या, लेख, कविता, कथा आणि चारोळ्या सातत्याने प्रसिद्ध होत असतात.
पत्रकारिता, साहित्य, गीतलेखन आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत सक्रिय असलेल्या भारत कवितके यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा त्यांचा १,१७८वा पुरस्कार आहे.










