घोसाळी स्मशानभूमीची दुरवस्था; मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची मागणी
मोखाडा, प्रतिनिधी : जगण्यातील संघर्ष मृत्यूनंतर तरी संपेल, अशी अपेक्षा असते; मात्र मोखाडा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमधील घोसाळी गावातील स्मशानभूमीची दुरवस्था पाहता मृत्यूनंतरही हालअपेष्टा संपत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सुमारे दीड हजार लोकसंख्या असलेल्या घोसाळी गावातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराचे गेट तुटलेले असून परिसराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शेडवरील स्टीलची पत्रे खराब झाल्याने अंत्यसंस्कार करताना अडचणी येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्मशानभूमीची जागा उतारावर असल्याने अंत्ययात्रा नेताना विशेषतः पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो. ओलसर मातीमुळे घसरून पडण्याची भीती असते. मागील पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे शेडमधून पाणी गळत असल्याने प्लास्टिकची ताडपत्री टाकून अंत्यसंस्कार करावे लागल्याचा अनुभव ग्रामस्थांनी सांगितला.
उन्हाळा सुरू असताना स्मशानभूमीची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून न दिल्यास आगामी पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, प्रवेशद्वार दुरुस्त करावे आणि शेडची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मृत व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप देता यावा, यासाठी स्मशानभूमीत किमान मूलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र घोसाळीतील सध्याची परिस्थिती पाहता या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.









