श्री सिंध नवजवान मंडळातर्फे जय्यत तयारी; आकर्षक आतषबाजीसह भव्य सोहळ्याचे आयोजन
अकोट | प्रतिनिधी
अकोट : विजयादशमीच्या पर्वावर अकोट शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या पारंपरिक रावण दहन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, यंदाही हा महोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. श्री सिंध नवजवान दसरा महोत्सव मंडळातर्फे आयोजित या महोत्सवाचे यंदा ६८ वे वर्ष आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भव्य रावण दहन सोहळा पार पडणार आहे.
सिंधी समाजाच्या पुढाकारातून सुरू झालेली ही परंपरा गेल्या ६८ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. यंदा ५० फूट उंच रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात येणार असून, आकर्षक आतषबाजी आणि प्रभू श्रीरामाच्या जयघोषात हा सोहळा रंगणार आहे. सत्याचा असत्यावर विजय हा संदेश देणाऱ्या या महोत्सवासाठी अकोट शहरासह तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमाला आमदार प्रकाश भारसाकळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी मंत्री सुधाकर गणगणे, माजी मंत्री रामदास बोडखे, माजी आमदार संजय गावंडे, नगराध्यक्ष मायाताई धुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धीरज हिंगणकर, उपसभापती विजय रहाणे, संचालक मंडळाचे सदस्य आणि डॉ. विशाल इंगोले यांच्यासह राजकीय, सामाजिक व व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष हेमंत मोटवानी, उपाध्यक्ष आकाश पारवाणी, कार्याध्यक्ष मोतीलाल तेजवाणी यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी परिश्रम घेत आहे. अकोट शहराची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.









