एकरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना, तर शेतमजुरांना २५ हजार रुपये मदतीची मागणी; एसडीओ कार्यालयातील कुंड्यांची तोडफोड
दर्यापूर | प्रतिनिधी
दर्यापूर : शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये, तर शेतमजुरांना २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी सोमवारी दर्यापूर तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. कर्जाचा वाढता बोजा, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व शेतमजुरांना ठोस आर्थिक मदत देऊन नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
एसडीओ कार्यालयातील कुंड्यांची तोडफोड
आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयातील कुंड्यांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय निवेदन सादर करण्यात आले. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्याऐवजी झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात योग्य आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या आंदोलनात सुनील गावंडे, डॉ. अभय गावंडे, अंकुश कावडकर, अनिल जळमकर, नितेश वानखडे, चंदू रायबोले, बहुनराव बिळ्हेकर, गुड्डू पटेल, आतिश शिरभाते, ओमप्रकाश कुटेमाटे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले होते.









