पंचशील बौद्ध समाज मंडळाच्या वतीने ध्वजारोहण; बुद्ध, धम्म आणि समतेच्या विचारांचा जागर
प्रतिनिधी :
बुर्गी, दि. २० ऑक्टोबर २०२६ : तथागत गौतम बुद्धांच्या समतावादी विचारांचा आणि भारतीय इतिहासातील धम्मक्रांतीचा जागर करत बुर्गी येथील पंचशील बौद्ध विहारात सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. पंचशील बौद्ध समाज मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ध्वजारोहण करून बुद्ध, धम्म आणि समतेच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बौद्ध उपासक-उपासिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भिकाजी झाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी तथागत गौतम बुद्धांच्या मानवतावादी विचारांचे स्मरण केले. तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा आपल्या जीवनात अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
धम्मचक्र परिवर्तन दिन हा केवळ ऐतिहासिक घटनेचे स्मरण करण्याचा दिवस नसून सामाजिक विषमता दूर करून समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. भगवान बुद्धांचा शांतता, करुणा आणि प्रज्ञेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित करण्यात आली. अशोक विजयादशमीच्या पर्वावर बुद्धांच्या धम्मविचारांचा जयघोष करत सामाजिक एकता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला भिकाजी झाडे, व्यंकटेश डोनारकर, विनोद दुर्गे, दिनेश दुर्गे, विभाकर झाडे, घनश्याम ओंडरे, प्रशांत दुर्गे, मधुकर डोनारकर, प्रफुल दुर्गे, संतोष झाडे, निलेश झाडे, प्रेमिला ओंडरे आणि अरुणा झाडे यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम ओंडरे यांनी केले, तर व्यंकटेश डोनारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. बुद्ध, धम्म आणि समतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.











