लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळातर्फे विशेष सत्कार; जिजामाता कन्या विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
लासलगाव प्रतिनिधी :
लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाद्वारे संचालित जिजामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा केदार यांना ‘आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक आणि नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या अध्यक्षा नीता पाटील यांनी शारदा केदार यांचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले
विद्यालयाच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान
यावेळी बोलताना नीता पाटील म्हणाल्या की, शारदा केदार यांना मिळालेला हा पुरस्कार केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ आणि जिजामाता कन्या विद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यालयाच्या प्रगतीसाठी तसेच विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शारदा केदार यांनी निष्ठेने, सर्जनशीलतेने आणि सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या योगदानामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीला बळ मिळाले आहे.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, कोषाध्यक्ष अभय पाटील यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. तसेच लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाच्या प्राचार्या विद्या कुलकर्णी, जिजामाता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन निकम, अर्चना पानगव्हाणे, श्रीहरी शिंदे यांच्यासह तिन्ही विद्यालयांतील शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शारदा केदार यांच्या या सन्मानामुळे शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. हा पुरस्कार जिजामाता कन्या विद्यालय आणि लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळासाठी गौरवास्पद ठरला आहे.











