धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोव्यातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता
आदमापूर :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथे श्री संत बाळूमामा महाराजांचा १३४ वा जन्मोत्सव सोहळा गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात साजरा होत आहे. या निमित्ताने बाळूमामा देवस्थान समितीच्या वतीने विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात गुरुवारी पहाटे ६ वाजता श्री बाळूमामा देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते पवित्र वीणापूजन आणि दीपप्रज्वलनाने होणार आहे.
यानंतर सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत भाविकांच्या उपस्थितीत ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या व बाराव्या अध्यायाचे तसेच ‘श्री बाळूमामा विजय ग्रंथा’चे पारायण होणार आहे. सायंकाळी ४.२३ वाजता ह.भ.प. नानासो शिवाजी पाटील महाराज यांचे प्रवचन होईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता ह.भ.प. प्रा. रामानंद दत्तात्रय पाटील महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम रंगणार आहे.
जन्मोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या रात्री १२ वाजता ककांडीकर परिवाराच्या मानाच्या वाळंगासह भजनी जागर होणार आहे. यावेळी आयोजित भव्य आतषबाजीमुळे आदमापूर परिसर उत्सवी वातावरणाने उजळून निघणार आहे.
या जन्मोत्सव सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच कर्नाटक आणि गोवा राज्यांतून लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थान समितीच्या वतीने दर्शन, महाप्रसाद आणि सुरक्षेच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.
संत बाळूमामा महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाळूमामा देवस्थान समिती आणि आदमापूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.











