प्रतिनिधी | सांगली
ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या वतीने जिल्हास्तरीय ‘कृष्णाई मिनी सरस’ बचत गट उत्पादन विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २४ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कल्पद्रुम मैदान, नेमिनाथनगर (सांगली) येथे होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रदर्शनात जिल्ह्यातील महिला बचत गटांचे एकूण ५५ वस्तूंचे स्टॉल तसेच २० खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. घरगुती व हस्तकला वस्तूंबरोबरच विविध प्रकारचे केक, चकली, लाडू, शेव, मसाले, लोणची, पापड, सांडगे, चटण्या, विविध प्रकारच्या शेवया, सेंद्रिय धान्ये, गूळ, कडधान्ये, हळद, तिखट, पावडर मसाले आदी खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत.
तसेच घरगुती साबण, अगरबत्ती, शोपीस, हस्तकला साहित्य, कापडी पिशव्या, भरतकाम साहित्य, साड्या, ड्रेस मटेरियल आदी विविध उत्पादनांची विक्री या ठिकाणी होणार आहे. स्थानिक पातळीवर तयार केलेल्या दर्जेदार वस्तूंना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून बाजारपेठ निर्माण करण्याचा हा उपक्रम आहे. त्यामुळे बचत गटांमध्ये समाधानाचे वातावरण असून महिलांना स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध होत आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांच्या उद्योजकतेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामीण उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देत महिला सबलीकरणाचा संदेश देणारे हे प्रदर्शन नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




