
पारगाव | प्रतिनिधी
पारगाव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर-2026) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू असून, ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे तसेच नावाची खात्री करून घेण्यासाठी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गावातील ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत नाहीत किंवा नव्याने समाविष्ट करावयाची आहेत, त्यांनी आधारकार्ड व पासपोर्ट आकाराचे छायाचित्र घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे यांनी केले आहे. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मतदार यादीचे पुनरीक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच नितीन ढोबळे, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी देवडे, काळुराम लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते बजरंगशेठ देवडे, ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजणे तसेच शंकर देवडे, विवेक चव्हाण, सूर्यकांत बोंबे, भगवान ढोबळे, जुबेर मनियार आणि शंकर दातीर उपस्थित होते.
मतदार यादी पुनरीक्षणाचे काम सुरळीत व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच रेशनिंग दुकानदार यांचेही सहकार्य लाभत आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपली मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती किंवा इतर आवश्यक बदल निर्धारित मुदतीत करून घ्यावेत, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
