ठाणे | प्रतिनिधी
ठाण्यातील मुंब्रा परिसरात मैत्रीचे नाते रक्तरंजित वैरात बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह निर्जन ठिकाणी टाकण्यात आल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खर्डी गावाजवळील निर्जन परिसरात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान फैज सुलतान मलिक आणि अल्बान सुलतान मलिक या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी अमन मुस्कीन शेख या आपल्या मित्राची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणातील नेमके कारण, गुन्ह्यामागील हेतू तसेच इतर बाबींचा तपास सुरू असून, आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
