प्रतिनिधी :
पांढरकवडा, दि. १ सप्टेंबर : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पांढरकवडा पोलीस ठाण्यात शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. परिसरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम राखण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सण-उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे करण्यासाठी प्रशासन व पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद किंवा आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीदरम्यान डीजेविरहित गणेशोत्सव, वाहतूक व्यवस्था, ध्वनिक्षेपकाचा मर्यादित वापर तसेच सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सण-उत्सवाच्या काळात सर्वांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, पत्रकार, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमुळे सण-उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय अधिक दृढ होण्यास मदत झाली.




