प्रदीप ताजने
पातूर प्रतिनिधी
गेल्या एक महिन्यापासून पावसाने खंड दिल्याने अकोला जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पातूर तालुक्यासह संपूर्ण अकोला जिल्हा तात्काळ कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी श्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला मार्फत निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
१. पातूर तालुक्यासह अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त (कोरडा दुष्काळ) जाहीर करण्यात यावा.
२. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे.
३. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट १००% पीक विम्याचा लाभ देण्यात यावा.
४. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट (कर्जमुक्त) ७/१२ कोरे करण्यात यावे.
निवेदनात म्हटले आहे की, अकोला जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून पावसाने खंड दिल्याने सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग ही मुख्य पिके पाण्याअभावी सुकत आहेत, काही ठिकाणी उन्हामुळे करपली आहेत. जमिनीत पावसाअभावी ओल नाही. अल्प व अनियमित पाऊस, पावसातील मोठे खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके जळत आहेत.
शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने पीक नुकसानामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढला असून, शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी खचून गेला असून त्याला आधाराची गरज आहे. अन्यथा शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकतो, अशी भीतीही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्वे करून अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुष्काळग्रस्त भागासाठी शासनाच्या सर्व सवलती व मदतीचा लाभ तातडीने द्यावा. तसेच विमा कंपन्यांच्या अडचणी दूर करून कोणताही भेदभाव न करता पात्र शेतकऱ्यांना १००% पीक विमा नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी रवि सोनोने ,प्रशांत ताले ,सचिन शेळके ,गणेश पाटील ,शालिग्राम राऊत, प्रकाश काळे, सुनील ताले, दशरथ सरदार ,रमेश जाधव ,सदाशिव घोरे ,ज्ञानेश्वर अडकणे ,गोपाल पजई ईत्यादी शेतकरी उपस्थित होते.






