कणकोरी प्रतिनिधी : गावातील अंगणवाडीची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, लहान बालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अंगणवाडीच्या वर्गातील भिंतींचे मोठे पोपडे निघाले असून जमिनीवरील फरशी (टाईल्स) अनेक ठिकाणी उखडून फुटली आहे.
अंगणवाडीची भिंत पडण्याची भीती निर्माण झाल्याने अंगणवाडी सेविकेला चिमुकल्या विद्यार्थ्यांना इमारतीच्या बाहेर बसवून शिक्षण द्यावे लागत आहे. या परिस्थितीमुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण असून, अनेक पालक भीतीपोटी आपल्या लहान मुलांना अंगणवाडीत पाठवण्यास घाबरत आहेत.
अंगणवाडीतील लहान मुले जमिनीवर बसून शिक्षण घेत असल्याने भिंतींमधून पडणारे पोपडे तसेच फुटलेल्या फरशीमुळे मुलांना दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अंगणवाडीतील शैक्षणिक वातावरणावरही परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर अंगणवाडीच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती करून भिंतींचे प्लास्टर व रंगकाम करण्यात यावे, तसेच उखडलेली व फुटलेली फरशी काढून नवीन फरशी बसविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात आज गावातील युवा वाल्मीक कैलास पवार यांनी मा. बालविकास प्रकल्प अधिकारी साहेब, पंचायत समिती गंगापूर यांच्या कार्यालयात निवेदन दिले. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन लवकरात लवकर दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.








