वरवणे, पेण (रायगड) : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, वरवणे, पेण, रायगड येथे रानभाज्या महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी विविध प्रकारच्या पारंपरिक व पौष्टिक रानभाज्या आणून त्यांचे प्रदर्शन भरविले. विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांची ओळख, स्थानिक नावे, उपलब्धता, पौष्टिक गुणधर्म तसेच आहारातील महत्त्व याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या विविध रानभाज्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा यांच्यातील सहभागातून पारंपरिक खाद्यसंस्कृती व स्थानिक जैवविविधतेचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच स्थानिक व पारंपरिक खाद्यपदार्थांविषयी त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री. एस. जे. जानकर यांनी केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्याने रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न झाला.










