
डॉल्बी-डीजेला फाटा देत ढोल-ताशे, लेझीम, झांज, टाळ-मृदंगाला प्राधान्य देण्याचे आवाहन
श्रीक्षेत्र माहूर : प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सव शांततामय, शिस्तबद्ध आणि सामाजिक प्रबोधनाचा ठरावा, तसेच कर्णकर्कश डॉल्बी व डीजेला फाटा देऊन ढोल-ताशे, लेझीम, झांज, टाळ-मृदंग यांसारख्या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांनी केले.
दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सिंदखेड येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गणेश मंडळांचे पदाधिकारी, डॉल्बी-डीजे चालक व मालक, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सपोनि जोंधळे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या निर्देशानुसार गणेशोत्सव शंभर टक्के डॉल्बीमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वनीप्रदूषणामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे गणेश मंडळांनी शासनाने निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादा आणि वेळेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
गणेशोत्सवाच्या काळात ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सवाचे अकराही दिवस केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता सांस्कृतिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करावेत, असे त्यांनी सांगितले.
तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता, महिला व बालकांची सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन यांसारख्या विषयांवर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्याचे आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत कर्णकर्कश डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. शासनाने निश्चित केलेल्या वेळेतच मिरवणूक पूर्ण करून श्री गणेशाचे विसर्जन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
तसेच गणेशमूर्ती शक्यतो लहान आकाराची घ्यावी, जेणेकरून विसर्जनाच्या वेळी मूर्तीची विटंबना होणार नाही, असेही सपोनि जोंधळे यांनी स्पष्ट केले. मिरवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाचा वैध विमा आणि चालकाचा वैध परवाना असणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्सव आनंदाचा असला तरी नियमांचे उल्लंघन करून इतरांना त्रास होणार नाही, याची प्रत्येक गणेश मंडळाने काळजी घ्यावी. नियमभंग करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत सपोनि संतोष जोंधळे यांनी गणेश मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
