पिंपरी चिंचवड.अडीच गुंठ्यांतील चार मजली इमारतीबाबत प्रश्नचिन्ह; बांधकाम परवानगी, मालकी हक्क आणि अपूर्ण कामांची चौकशी करण्याची मागणी
चिखली येथील ताम्हाणे वस्ती परिसरातील एका चार मजली इमारतीतील सदनिकाधारकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. सदनिकांसाठी बिल्डरला पैसे दिल्यानंतरही खरेदीखत, ताबापत्र आणि महापालिकेची करपावती मिळाली नसल्याचे सदनिकाधारकांचे म्हणणे आहे. त्यातच लिफ्टचे काम अपूर्ण, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे आणि स्वतंत्र वीज मीटरचा प्रश्न कायम असल्याने रहिवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सदनिकाधारकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे अडीच गुंठे जागेत चार मजली इमारत उभारण्यात आली आहे. प्रत्येक मजल्यावर चार वन बीएचके सदनिका असून, पार्किंगच्या जागेतही दोन आरके सदनिका असल्याचे सांगण्यात येते. या बांधकामाला आवश्यक परवानगी आहे का, मंजूर नकाशानुसार बांधकाम झाले आहे का आणि पार्किंगच्या जागेचा वापर नियमानुसार झाला आहे का, याबाबत अधिकृत तपासणी होणे आवश्यक आहे.
पैसे दिले, पण महत्त्वाची कागदपत्रे मिळाली नसल्याचा आरोप
सदनिकाधारकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सदनिका खरेदीसाठी बिल्डरला धनादेशाद्वारे पैसे दिले आहेत. मात्र, त्यांना नोंदणीकृत खरेदीखत, ताबापत्र आणि महापालिकेची करपावती मिळालेली नाही.
सदनिकांच्या मालकी हक्काशी संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्याने रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. घर खरेदी करताना केलेल्या व्यवहाराची कायदेशीर स्थिती स्पष्ट व्हावी आणि आवश्यक कागदपत्रे मिळावीत, अशी त्यांची अपेक्षा आहे.
लिफ्ट, पाणी आणि वीज सुविधांचा प्रश्न
इमारतीतील लिफ्टचे काम अपूर्ण असल्याचे सदनिकाधारकांचे म्हणणे आहे. पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा नसणे, स्वतंत्र वीज मीटर उपलब्ध नसणे आणि पार्किंगची व्यवस्था अपुरी असणे, अशा समस्यांमुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
बिल्डरच्या उत्तरामुळे नाराजी
सदनिकाधारकांनी अपूर्ण कामे आणि आवश्यक कागदपत्रांबाबत बिल्डरकडे विचारणा केली असता, सुरुवातीला काम करून देण्याचे आश्वासन मिळाल्याचे ते सांगतात. मात्र, त्यानंतर झालेल्या संभाषणात बिल्डरने ‘काय करायचे ते करून घ्या,’ अशा शब्दांत उत्तर दिल्याचा दावा सदनिकाधारकांनी केला आहे.
या प्रकरणात संबंधित बिल्डरची बाजू जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच इमारतीच्या बांधकाम परवानगीची आणि उपलब्ध अधिकृत कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
महापालिका प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी
या इमारतीच्या बांधकाम परवानगीची, मंजूर नकाशाची, पार्किंगच्या जागेच्या वापराची आणि उपलब्ध नागरी सुविधांची तपासणी करण्यात यावी. सदनिकाधारकांच्या तक्रारींची चौकशी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी या प्रकरणाच्या अनुषंगाने करण्यात येत आहे.










