बालूभाऊ वाकडे यांच्याकडून प्रवेशद्वारासाठी ५० हजारांची देणगी; श्यामभाऊ वाकडे यांच्याकडून ११ हजारांची मदत
मंगरूळ नवघरे : वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी योगदान देत मंगरूळ नवघरे येथील वाकडे बंधूंनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त बालूभाऊ रमेशराव वाकडे यांनी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा, मंगरूळ नवघरे येथे प्रवेशद्वारावरील डोमसाठी अंदाजे ५० हजार रुपयांची भेट दिली. तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्यामभाऊ वाकडे यांनी शाळेला ११ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
बालूभाऊ रमेशराव वाकडे हे मंगरूळ नवघरे येथील प्रतिष्ठित व्यावसायिक रमेशभाऊ वाकडे यांचे चिरंजीव आहेत. दोन्ही वाकडे बंधूंनी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी शाळेच्या विकासासाठी मदतीचा हात पुढे केला.
बालूभाऊ वाकडे यांनी दिलेल्या देणगीतून शाळेच्या प्रवेशद्वारावरील डोम उभारण्यास मदत होणार आहे. तर श्यामभाऊ वाकडे यांनी दिलेल्या ११ हजार रुपयांच्या मदतीमुळे शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना हातभार लागणार आहे. त्यांच्या या उपक्रमाचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले.
दानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
‘हस्तस्य भूषणं दानम्’ अर्थात दान हेच हाताचे खरे भूषण आहे, या उक्तीप्रमाणे वाकडे बंधूंनी आपल्या कृतीतून दातृत्वाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शाळेच्या विकासासाठी दिलेले हे योगदान प्रेरणादायी ठरत आहे.
वाकडे बंधूंच्या या सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच दोघांनाही वाढदिवसाच्या आणि निरोगी, दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या दातृत्वामुळे शाळेच्या विकासाला हातभार लागण्यासोबतच समाजातील इतर दानशूर व्यक्तींनाही शैक्षणिक कार्यासाठी पुढे येण्याची प्रेरणा मिळणार आहे.











