जलालखेडा:
विवाहित तरुणी शीतल सुभाष चरपे हिच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक व नवीन मोड आला असून, जलालखेडा पोलिसांनी एका ऑटो चालकाविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. विकास रमेश कांबळे (निवासी आमनेर, जि. अमरावती) असे आरोपी ऑटो चालकाचे नाव आहे. तांत्रिक पुरावे, गुप्त माहिती आणि मृत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. न्यायालयाने आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अपघाताचा संशय, पण तपासात हत्येचा उलगडा
२४ वर्षीय शीतल चरपे मंगळवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास जलालखेडा-काटोल रस्त्यावरील नायगाव (ठाकरे) गावाजवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. स्थानिक युवकांनी तिला तात्काळ उपचारासाठी जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सुरवातीला पोलिसांनी या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. परंतु, तपासादरम्यान गुप्त माहिती, सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि शीतलच्या कुटुंबीयांच्या माहितीवरून तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी संशयित ऑटो चालक विकास कांबळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चिमुकलीचे मातृछत्र हरपले!
शीतलच्या पहिल्या पतीचे आधीच निधन झाले होते. त्यामुळे ती तिच्या साडेचार वर्षांची मुलगी भार्गवीसह आपल्या आईकडे राहत होती आणि एका दुकानात काम करून मुलीचा सांभाळ करत होती. आता शीतलच्या मृत्यूनंतर या लहान मुलीच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी तिच्या आजीवर (नानी) आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
मोबाईल गायब, CDR वरून तपासाची चक्रे वेगवान
शीतलचा मोबाईल फोन घटनेच्या दिवसापासून गायब आहे. पोलिसांनी या मोबाईलचा शोध सुरू केला आहे, कारण फोनमधील माहिती तपासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. तसेच शीतलला सतत फोन करून त्रास देणाऱ्या काही स्थानिक संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यात बोलावले आहे.
पोलीस सध्या शीतलच्या मोबाईलचे ‘कॉल डिटेल्स रेकॉर्ड’ (CDR) मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. CDR रिपोर्ट मिळाल्यानंतर घटनेपूर्वी तिचे कोणाकोणाशी संभाषण झाले होते, यावरून आणखी काही महत्त्वाचे सुगावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विनोद जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश महाकाळ आणि माया वैश्य करत आहेत.
प्रतिनिधी,,
पवन वानखेडे
जलालखेडा/नागपूर











