बुद्ध-धम्म स्वरआराधनेतून तथागत बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा
रत्नागिरी : अशोक विजयादशमीच्या निमित्ताने तथागत गौतम बुद्धांचा मानवतावादी विचार, सम्राट अशोकांचा धम्मविजय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘मंगल धम्म प्रभात – बुद्ध-धम्म स्वरआराधना’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ठीक ५.४५ वाजता, विपश्यना ध्यान धारणा केंद्र, गयाळवाडी, खेडशी, रत्नागिरी येथे होणार आहे.
पहाटेच्या प्रसन्न वातावरणात बुद्ध-धम्मावरील प्रबोधनपर गीतांच्या माध्यमातून तथागत बुद्धांची करुणा आणि प्रज्ञा, सम्राट अशोकांचा युद्धाकडून धम्माकडे झालेला वैचारिक प्रवास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचा सामाजिक आणि मानवतावादी आशय उलगडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात दिलीप मोहिते, अमरदीप कदम आणि सिद्धी कासारे यांचे गायन होणार असून संगीत संयोजनाची जबाबदारी दिलीप मोहिते सांभाळणार आहेत. गौरव पाटकर तबल्यावर, ओंकार आंबेकर सिंथेसायझरवर, तर नागसेन कांबळे तालवाद्यावर साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रमाचे निवेदन आणि आयोजन सुशील जाधव यांनी केले असून कार्यक्रमाला कवी, लेखक, नाट्य -चित्रपट दिग्दर्शक आयु. उदय जाधव यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या उपक्रमाला संतोषजी कासारे, मंडणगड तसेच धम्मदीप मंडळ, गयाळवाडी, रत्नागिरी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
अशोक विजयादशमी हा केवळ एका ऐतिहासिक घटनेचे स्मरण करण्याचा दिवस न राहता मानवी जीवनात करुणा, विवेक, अहिंसा आणि समतेची मूल्ये रुजविण्याची प्रेरणा देणारा दिवस ठरावा, या भूमिकेतून ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन करण्यात आले आहे.
संगीत आणि विचार यांची सांगड घालणाऱ्या या पहाटेच्या धम्ममय कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.!
त्याचबरोबर समाजातील नवीन तरुण-तरुणींना बाबासाहेबांच्या चळवळी बरोबरच इतिहासातील चळवळीचे लेखक कवी आणि भविष्यातील अभिजात संगीताकडे वळण्यासाठी हा एक मानदंड ठरावा असा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असं आयोजक सुशील जाधव गुरुजी यानी व्यक्त केले आहे.










