रोटी गावात पाण्याची भीषण परिस्थिती!
रोटी, ता. दौंड, जि. पुणे :
दौंड तालुक्यातील रोटी गावात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागत आहे. वासुंदे, जीरेगाव , हिंगणीगाडा आणि पांढरेवाडी या गावांच्या दिशेने पाणी सोडण्यात आले असताना, रोटी गावातील नागरिकांनी आपल्या गावाच्या हक्काचे पाणी मिळेल या अपेक्षेने गावालगतच्या कालव्याची दुरुस्ती करून घेतली. मात्र, एवढे प्रयत्न करूनही रोटी गावाला अद्याप पाणी मिळाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
रोटी गावातील नागरिकांनी पाणी मिळावे यासाठी पुढाकार घेत कालव्याच्या दुरुस्तीचे काम करून घेतले. पाणी सोडले जाईल आणि गावातील पाणीटंचाई दूर होईल, अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र, इतर गावांच्या दिशेने पाणी जात असताना रोटी गावातील नागरिकांना पाण्याची वाट पाहावी लागत असल्याचे चित्र समोर येत आहे.
दुरुस्तीचा खर्च आणि ग्रामस्थांचे प्रयत्न करूनही पाणी मिळत नसेल, तर या परिस्थितीला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
रोटी गावाला पाणी कधी मिळणार?
संबंधित पाटबंधारे विभागाने रोटी गावातील पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कालव्याची पाहणी करावी. पाणी अडण्यामागील कारणांचा शोध घेऊन रोटी गावाला नियोजनानुसार पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत, पण पाणी मिळणार कधी? हा प्रश्न आज रोटी गावातील नागरिकांसमोर उभा आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाणीप्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








