तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या प्रकारच्या कर्करोगांची तपासणी करण्यात आली…!
लवकर निदानासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार; ग्रामीण भागात जनजागृतीवर भर….!!
सुरेंद्र सोनवणे, पारगाव-शिंगवे प्रतिनिधी:-
( शिंगवे, ता. आंबेगाव ) : कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शिंगवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) कर्करोग तपासणी व्हॅनच्या माध्यमातून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत झालेल्या शिबिरात तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांची तपासणी करण्यात आली.
कर्करोगाचे प्रारंभिक अवस्थेत निदान झाल्यास उपचार वेळेत सुरू करण्यास मदत होते. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे आणि प्रतिबंधात्मक तपासणीचे महत्त्व पटवून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हकारे आणि तालुका आरोग्य अधिकारी तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. सुहास मैड, डॉ. उमेश सहाने, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रीती डामसे, मुख शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत सोनुने, डॉ. शेषराव मुरकुटे, प्रेमांकिता शिंदे यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या.
या शिबिराला पंचायत समिती सदस्य श्वेता ढोबळे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ, पोलीस पाटील गणेश पंडित, उपसरपंच हिरामण गोरडे, पारगाव ग्रामपंचायत सदस्य रोहिणी देवडे आणि सोसायटी संचालक प्रकाश वाव्हळ यांनी भेट दिली.
ग्रामीण भागात कर्करोग तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना प्राथमिक स्तरावर तपासणी करून घेण्याची संधी मिळाली. कर्करोगाचे वेळीच निदान आणि योग्य उपचार यांसाठी नियमित आरोग्य तपासणी महत्त्वाची असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी दिली.










