प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन; आठ ते दहा दिवसांत कार्यवाहीकडे लक्ष
खटाव प्रतिनिधी :
भारतीय सैन्यदलात १७ वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले व सध्या वाकेश्वर (ता. खटाव) येथे शेती करणारे माजी सैनिक सतीश काळे यांनी शेतरस्त्याच्या वादप्रकरणी मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले आहे. या प्रकरणात लक्ष घालून पुढील आठ ते दहा दिवसांत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सतीश काळे यांच्या मालकीची गट क्रमांक ४०८ मधील शेतजमीन वाकेश्वर येथे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या जमिनीच्या बांधावरून उत्तर, पश्चिम आणि दक्षिण अशा तीन बाजूंनी इतरांना जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, संबंधित काही शेतकऱ्यांच्या जमिनीलगत असलेल्या कालव्यावरूनही जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध असताना त्यांच्याविरोधात तहसीलदार खटाव यांच्या न्यायालयात रस्त्यासंदर्भात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणात तहसीलदार, वडूज यांनी २५ जून २०२६ रोजी वाकेश्वर येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि पंचनामा केला. काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्थळपाहणी अहवालात अर्जदार रुक्मिणी शिवाजी फडतरे यांच्यासह १५ जणांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध असल्याची नोंद करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर माजी सैनिक सतीश काळे यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे आपली बाजू मांडली असून, प्रकरणाची योग्य चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. मंत्री गोरे यांनी या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे निवेदनकर्त्यांकडून सांगण्यात आले.










