अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि विविध विभागांतील कामगारांच्या उपस्थितीत पूजाविधी, मनोरंजक उपक्रम व महाप्रसादाचे आयोजन
खालापूर वार्ताहर : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाजवळ असलेल्या गोल्फ सिटी सावरोली येथे दसरा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी व्यवस्थापनातील अधिकारी, सुरक्षा विभागातील कर्मचारी तसेच गार्डन, इलेक्ट्रिशियन आणि मेंटेनन्स विभागातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात टीसीएफएम (TCFM) कार्यालयात श्री गजाननाच्या प्रतिमेचे पूजन करून आणि नारळ फोडून करण्यात आली. यावेळी गोल्फ सिटीचे व्यवस्थापक श्री. गुंजा साहेब, सुरक्षा व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी श्री. कुशल साहेब, टीसीएफएमचे मुख्य अधिकारी श्री. निखिल मुंडे, टीसीएफएम सुपरवायझर श्री. भालचंद्र जगताप आणि श्री. तुकाराम कांबळे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. श्री. पाठारे साहेब, श्री. रोशन साहेब आणि रबिना मॅडम यांच्यासह इतर मान्यवरांनीही पूजाविधीत सहभाग घेतला.
त्यानंतर गोल्फ सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर हार घालून पूजाविधी करण्यात आला. व्यवस्थापक श्री. गुंजा साहेब, सुरक्षा विभागाचे मुख्य अधिकारी आणि श्री. कुशल साहेब यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी आणि कामगारांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला.
दसरा सणानिमित्त विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गार्डन विभागातील श्री. अनिल साहेब, तसेच शंकर मोरे, नितीन निकाळे, महाडीक, हरेश, प्रदीप सताणे यांच्यासह विविध विभागांतील कर्मचारी आणि महिला कामगारांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान सर्व कामगारांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
श्री. निखिल मुंडे यांच्या पुढाकाराने सर्व अधिकारी आणि कामगारांचा सामूहिक छायाचित्राचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. तसेच श्री. रोशन साहेब, श्री. जगताप साहेब आणि श्री. गितेश साहेब यांच्या पुढाकाराने महाप्रसाद वाटप, कार्यालयाच्या विविध प्रवेशद्वारांना हार घालणे आणि इतर धार्मिक उपक्रम राबविण्यात आले.
अशा प्रकारे गोल्फ सिटी सावरोली येथे अधिकारी आणि कामगारांनी एकत्र येत दसरा सण आनंदी वातावरणात साजरा केला. या कार्यक्रमातून कामगारांमधील एकोपा, सहकार्य आणि सणाचा उत्साह अनुभवायला मिळाला.










