ग्रामसभेतील टँकर सुरू करण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी नसल्याचा महिलांचा आरोप; गावात तातडीने शासकीय टँकर सुरू करण्याची मागणी
नांदूरघाट (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूरघाट येथे तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. “जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही संपूर्ण जिल्ह्याचे मायबाप आहात. आमच्या गावाची दखल घ्या आणि आम्हाला पाणी द्या,” अशी आर्त विनंती करत महिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. नवरात्रोत्सवाच्या काळातच गावात पाणीटंचाई गंभीर बनल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तीन तासांच्या आंदोलनानंतर ग्रामसेवक आणि सरपंच घटनास्थळी उपस्थित झाल्याचे सांगण्यात आले.
ग्रामसभेतील आश्वासनाची अंमलबजावणी नसल्याचा आरोप
महिलांच्या म्हणण्यानुसार, सुमारे आठ दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत गटविकास अधिकारी (बीडीओ) आणि सरपंच यांनी गावात पाण्याचे टँकर तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप टँकर सुरू झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील पाणीसाठे संपल्याने तसेच ५०० ते ६०० फूट खोल असलेल्या बोअरवेलमधील पाणीही आटल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. विहिरींनीही तळ गाठल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची परवड
सध्या गावातील सुमारे ५० कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासत असल्याचे महिलांनी सांगितले. वेळीच उपाययोजना न झाल्यास पाणीटंचाईचा फटका आणखी कुटुंबांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे. गावात मोठी कुटुंबे आणि पाळीव जनावरे असल्याने पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठीही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. आगामी सणासुदीच्या काळात पाण्याची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा
गावातील लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, गटविकास अधिकारी आणि पंचायत समिती प्रशासनाकडून आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला. त्यामुळे महिलांनी थेट बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
“आमच्या गावात मोठी कुटुंबे आणि जनावरे आहेत. पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता नांदूरघाटमध्ये तातडीने शासकीय पाण्याचे टँकर सुरू करावेत,” अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे. आता प्रशासन या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कोणती ठोस पावले उचलते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.










