अरुंद रस्त्यावरून ट्रॅक्टर व वाहनांची ये-जा कठीण; पीक काढणीनंतर अडथळे दूर करण्याचे शेतकऱ्यांचे आश्वासन
वाहेगाव साळ, ता. चांदवड (प्रतिनिधी) : चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ येथे शेतरस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि अगळ्यांमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी काळखोडे फाट्याजवळ, कलाकृती कलेक्शन परिसरातून शेतीत पाईप घेऊन जाणाऱ्या पिकअपचा टायर रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या अडथळ्यांमुळे फुटल्याची घटना घडली.
या शेतरस्त्याची रुंदी कमी असून दोन्ही बाजूंनी झाडे आणि अगळ्या वाढल्याने वाहनांना ये-जा करताना अडचण निर्माण होत आहे. विशेषतः शेतीच्या कामासाठी जाणारे पिकअप, ट्रॅक्टर आणि इतर वाहनचालकांना रस्त्यावरून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. याच रस्त्याने पुढे एका वस्तीवर जाण्याचा मार्ग असल्याने तेथील नागरिकांनाही दररोज ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्याच्या मध्यभागी आलेल्या झाडांच्या फांद्या डोळ्यांना लागण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीची कामे आणि वाहतुकीसाठी हा रस्ता मोकळा असणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
घटनेनंतर गावचे पोलीस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. सध्या शेतात काम सुरू असल्याने झाडांच्या फांद्या काढताना पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. पीक काढणीनंतर झाडांच्या फांद्या काढून अगळ्या लावून घेण्याची तयारी त्यांनी दर्शविल्याची माहिती मिळाली.
आता पीक काढणीनंतर शेतरस्ता मोकळा होणार का, याकडे शेतकरी आणि वस्तीवरील नागरिकांचे लक्ष लागले आहे. रस्त्यावरील अडथळे दूर करून शेतीसाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षित ये-जा करण्यासाठी मार्ग खुला करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.










