मुंबई–हैदराबाद महामार्गावरील रायता हॉटेलजवळ अपघात; जखमींना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल
नळदुर्ग : मुंबई–हैदराबाद महामार्गावरील नळदुर्ग बायपास रस्त्यावर रायता हॉटेलजवळ शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.५५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. बसवकल्याण येथून तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना हैदराबादहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरची धडक बसल्याने सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे संगमेश्वर बसवराज बेलुरे (वय ३३), रोहन दशरथराव हाचाटे (वय ३९) आणि महादेव रामलिंगय्या मठपती (वय २१) अशी आहेत. हे तिघेही कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथील रहिवासी आहेत. अपघातात सहभागी कंटेनरचा क्रमांक MH.04.NB.9671 असा आहे.
अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, नळदुर्ग पॉइंटवरील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक सुनील भोळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.
अपघाताची माहिती अक्षय करपे यांनी दिली. अपघाताचे नेमके कारण आणि सर्व जखमींच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.










